Monday, 13 February 2017

क्रिकेटचा इतिहास


क्रिकेटचा इतिहास

क्रिकेट, खेळांचा राजा क्रिकेट! फुटबॉलनंतरचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लोकप्रिय खेळ. क्रिकेटवेड्या आपल्या भारतात तर क्रिकेट म्हणजे लोकांचा धर्मच जणू. आपल्या पुराण कथांमध्ये भगवान श्रीकृष्ण बालगोपाळांसमवेत यमुनेच्या तिरी चेंडू फळीचा खेळ खेळत असल्याचा उल्लेख आढळतो. पण त्याला ठोस ऐतिहासिक आधार नाही.आधुनिक काळामध्ये क्रिकेटची सुरुवात ही इंग्लंडमध्ये झाल्याचे मानले जाते. इंग्लंडमधील ग्रामीण भागात गुरे चारायला नेणाऱ्या गुराख्यांच्या कल्पकतेतून या खेळाचा जन्म झाला असावा. सुरुवातीच्या काळात इंग्लंडमधले गुराखी गुरे चारायला नेल्यावर क्रिकेट खेळत. क्रिकेट संबंधीच्या दस्तऐवजांमध्ये तेराव्या शतकात क्रिकेट खेळण्यास सुरुवात झाल्याचा उल्लेख आढळतो. त्यावेळी या खेळाचे स्वरूप हे अगदी प्राथमिक स्वरूपाचे होते. त्यानंतर हळूहळू उत्क्रांत होत या खेळाला आजचे आधुनिक रूप प्राप्त झाले. सुरुवातीच्या काळात क्रिकेटला इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात राजाश्रय आणि लोकाश्रय मिळाला. तसेच क्रिकेटला सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणूनही ओळखले जाऊ लागले.
इ.स. १३०० दरम्यान दुसरा एडवर्ड हा राजा क्रिकेट खेळत असल्याचा उल्लेख आहे. सुरुवातीला क्रिककेटचे नाव craic असे होते. याचा शब्दाचा अर्थ आनंद आणि सर्वसामान्यांचा खेळ असा होतो. सुरुवातीची काही शतके केवळ लहान मुलांचा खेळ म्हणून क्रिकेटची ओळख होती. पुढे १७व्या शतकात मोठ्या लोकांनीही क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. सतराव्या शतकाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये इंग्लंडमधील ग्रामीण भागात क्रिकेट बऱ्यापैकी स्थिरावले. केवळ विरंगुळा म्हणून सुरू झालेले क्रिकेट हळूहळू इंग्लंडमधील बहुतांश भागात खेळले जाऊ लागले. याच काळात क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. सतराव्या शतकाच्या मध्यावर काही काळ क्रिकेटवर बंदीही घालण्यात आली होती, मात्र ही बंदी लवकरच उठवण्यात आली. सतराव्या शतकाच्या अखेरीस क्रिकेट संबंधीच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित होऊ लागल्या. पण क्रिकेटचे सविस्तर वृत्तांकन होण्यासाठी मात्र बराच काळ जावा लागला.
सुरुवातीच्या काळामध्ये हा खेळ आजच्यासारखा प्रगत नव्हता. बॅट, बॉल, पॅड्स, हॅल्मेट, हँडग्लोव्हज, यष्ट्या अशा सध्याच्या क्रिकेटची ओळख बनलेल्या बाबींचा त्याकाळी अभाव होता. त्याकाळी एखाद्या काठीचा बॅटसारखा वापर होई, तर कुठल्याशा गोल वस्तूचा बॉल म्हणून वापर केला जाई. यष्ट्याही नव्हत्या. झाडाच्या एखाद्या बुंध्याचा यष्ट्या म्हणून उपयोगात आणल्या जात. इंग्रजीमध्ये झाडाच्या बुंध्याला स्टम्प असे म्हटले जाते. त्यावरूनच खेळपट्टीवर रोवण्यात येणाऱ्या यष्ट्यांसाठी स्टम्प्स हे नाव प्रचलित झाले.

पुढे या साधनांमध्ये क्रमाक्रमाने उत्क्रांती होत गेली. बॅट म्हणून वापर होणाऱ्या काठीच्या आकारमानात बदल होत गेला. कमी रुंदीच्या बॅटमुळे फटके खेळता येत नसत तसेच चेंडू हुकल्यामुळे फलंदाजही लवकर बाद होत. त्यामुळे काही फलंदाजांनी जास्तीत जास्त रुंद बॅटने फलंदाजी करण्यास सुरुवात केली. जास्त रुंदीचे फळकूट हातात धरावयास अवघड होते. म्हणून त्याला हँडल वापरावयास सहज म्हणून दंडगोलाकार व हॉकी स्टीकसारख्या बॅटचा वापर होऊ लागला. नंतर बॅटचा वापर होऊ लागला. बॅटच्या रुंदीबाबत सुरुवातीला काही नियम नव्हते़ पण एकदा एक फलंदाज बऱ्यापैकी रुंद बॅट घेऊन फलंदाजीसाठी आल्यानंतर बॅटचा आकार हा निश्चित करण्यात आला त्यानुसार बॅटची रुंदी १२ से.मी. व लांबी ९५ से.मी. एवढी ठरवण्यात आली. तसेच बॅट कशाची असावी हेही अगदी अलीकडेपर्यंत निश्चित नव्हते. नियमाचा आधार घेऊन ऑस्ट्रेलियाच्या डेनिस लिलीने एका सामन्यात अॅल्युमिनियमची बॅट घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मात्र बॅट ही लाकडाची असावी, असा नियम करण्यात आला.
गोलंदाजीसाठी वापरला जाणारा चेंडूही हळूहळू प्रगत होत गेला. सुरुवातीला गोल लाकूड, गोल दगड, गोल फळे यांचा चेंडू म्हणून वापर होत असे. नंतर खेळाडूंना दुखापत होऊ नये म्हणून चेंडुभोवती कापडाचे आवरण गुंडाळण्यात येऊ लागले. पण हे कापड लवकर फाटत असल्याने चेंडू रबरी आवरणात गुंडाळण्यास सुरुवात झाली. पुढे कातडीच्या शिवणीचा चेंडू वापरात आणला गेला. कालांतराने चेंडूचे वजन १५५ ते १६३ ग्रॅम व व्यास २२ सेमी निश्चित करण्यात आला.
झाडाच्या बुंध्यापासून सुरू झालेला यष्टयांचा प्रवासही हळूहळू उत्क्रांत होत गेला. शहरी भागामध्ये झाडांचे बुंधे सहज मिळत नसल्यामुळे काठी रोवून त्याचा स्टंपसारखा वापर करण्यात येऊ लागला. एक काठी उभी केल्यामुळे फलंदाजाला बाद करणे अवघड झाले. त्यावर उपाय म्हणून दोन काठ्या उभ्या केल्या जाऊ लागल्या. पण दोन काठ्यांमध्ये किती अंतर ठेवायचे याला नियम नव्हता. काठ्या पडल्यावर फलंदाज बाद होत, पण दोन काठ्यांतून चेंडू आरपार जात असे. त्याकाळी धावबादचा नियमही गमतीशीर होता. फलंदाजाने फटकवलेला चेंडू क्षेत्ररक्षकाने दोन स्टंपच्या मध्ये असलेल्या खळग्यात ठेवल्यावर फलंदाज बाद होई. पुढे दोन्ही बाजूला तीन स्टम्प्स लावायची सुरुवात झाली. तसेच स्टम्प्समधील अंतर ९ इंच आणि स्टम्पची उंची २८ इंच एवढी निर्धारित करण्यात आली.
बॅट, चेंडू, खेळपट्टी, षटके, बाद होण्याची पद्धती यासंबंधीचे काही नियम कालानुरूप विकसित झाले होते. पुढे १७२८ मध्ये हे नियमांना एकत्रित करण्याचे काम झाले़ त्यानंतर १७४४ मध्ये क्रिकेटचे नियम सर्वप्रथम संहिताबद्ध करण्यात आले. त्यामुळे गोंधळ कमी होऊन सभ्य क्रिकेटला सुरुवात झाली. १७७४ मध्ये या नियमांमध्ये पायचीत, मधली यष्टी, बॅटच्या रुंदीची मर्यादा या नव्या नियमांचा समावेश करण्यात आला. तसेच मैदानावर या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पंचांची नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण नियमही यात समाविष्ट झाला. शेवटी १७८७ मध्ये ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर मेरिलबोर्न क्रिकेट क्लबची स्थापना करण्यात आली. आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये क्रिकेट संबंधीचे नियम मेरिलबोर्न क्रिकेट क्लबकडून तयार केले जातात.
सुरुवातीला खेळवल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यांची फारशी माहिती उपलब्ध नसली तरी १८ जून १७४४ मध्ये झालेल्या सामन्याचा धावफलक लंडन येथे उपलब्ध आहे. १७५० मध्ये हॅम्बल्डन क्रिकेट क्लबची स्थापना झाली. एमसीसीची स्थापना होईपर्यंत हॅम्बल्डनचा क्रिकेटमध्ये दबदबा होता.
या काळात क्रिकेटला अनेक संकटांचाही सामना करावा लागला. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडमध्ये सात वर्षीय युद्ध सुरू झाल्यानंतर अर्थपुरवठ्याचा अभाव आणि खेळाडूंच्या अनुपलब्धतेमुळे क्रिकेट बंद पडलेे. त्यानंतर नेपोलियनच्या युद्धादरम्यानही क्रिकेटच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता.
१८१४ मध्ये लंडन शहरात क्रिकेटची पंढरी समजले जाणारे लॉर्ड्स स्टेडियम बांधण्यात आले. थॉमस लॉर्ड यांनी १७८७ रोजी या मैदानावर पहिला सामना खेळवला होता. नंतर १८०५ मध्ये आंतरशालेय व १८२७ मध्ये आंतरविद्यापीठ सामने सुरू झाले. यादरम्यान, ससेक्ससारखे अनेक आघाडीच्या कौंटी क्लब स्थापन झाले. १९व्या शतकात लागलेल्या रेल्वेच्या शोधामुळेही क्रिकेटच्या विकासास हातभार लागला. नव्यानेच सुरू झालेल्या कौंटी क्लबमधून विवाहित विरुद्ध अविवाहित, डावखुरे विरुद्ध उजवे, सभ्य गृहस्थ विरुद्ध खेळाडू यांच्यात सामने खेळवले गेले.
इंग्लंडमध्ये क्रिकेट बाळसे धरत असताना पहिला आंतरराष्ट्रीय सामना १८४४ साली अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळवला गेला. १८५९ साली पहिल्यांदा इंग्लंडमधील व्यावसायिक संघ विदेश दौऱ्यावर रवाना झाली. तसेच १८६२ मध्ये इंग्लंडच्या संघाने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. एव्हाना इंग्लंडमध्ये क्रिकेटची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. १८६४पासून इंग्लंडमध्ये नियमित कौंटी चॅम्पियनशिपला सुरुवात झाली. त्यानंतर १८६८ मध्ये ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आला.

इ.स. १५ मार्च १८७७ हा दिवस क्रिकेटच्या वाटचालीतील ऐतिहासिक दिवस ठरला. जेम्स लिलिव्हाईटचा एमसीसी संघ आणि सिडने मेलबर्नचा संघ यांच्यात या दिवसापासून कसोटी सामना खेळवला गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा पहिलाच कसोटी सामना ठरला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४५ धावांनी बाजी मारली. या सामन्याची आठवण म्हणून शंभर वर्षांनंतर १९७७ साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये शतक महोत्सवी सामना खेळवला गेला होता. योगायोग म्हणजे त्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने ४५ धावांनी विजय मिळवला. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधील पहिला चेंडू टाकण्याचा मान इंग्लंडच्या आल्फ्रेड शॉने मिळवला होता. तर पहिला चेंडू खेळण्याचा, पहिली धाव काढण्याचा आणि कसोटी क्रिकेटमध्ये पहिले शतक फटकावण्याचा मान ऑस्ट्रेलियाच्या चार्ल्स बॅनरमर यांनी पटकावला.
१८८० मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ ओव्हलवर कसोटी खेळला. यादरम्यान एका सामान्यात इंग्लंडला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्यावर दोघांनी वर्तमानपत्रांची राख एका छोट्या कपमध्ये भरून ऑस्ट्रेलियाला पाठवली. त्यातूनच ऍशेस मालिकेचा जन्म झाला. पहिली ऍशेस मालिका १८८२-८३ साली खेळवली गेली. सुरुवातीच्या वर्षांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघांमध्येच आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळवले जात होते. नंतर १८८९ मध्ये दक्षिण आफ्रिकेला तिसरा कसोटी देश म्हणून मान्यता देण्यात आली.
क्रिकेटचा प्रसार वाढत असताना १९००मध्ये पॅरिस येथे झालेल्या दुसऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला. इंग्लंड व फ्रान्स यांच्यात ऑलिम्पिकमधील पहिला व शेवटचा सामना २० ऑगस्ट १९००मध्ये खेळला गेला. हा सामना एका दिवसातच आटोपला होता. यानंतर मात्र ऑलिम्पिकमध्ये कधीही क्रिकेटचा समावेश झाला नाही.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाकांक्षी असलेल्या ब्रिटिशांमुळे जेथे जेथे ब्रिटिश राज्य पोहोचले त्या त्या भागात क्रिकेटचा प्रसार झाला. गोरे सैनिक फावल्या वेळेत क्रिकेट खेळत असत. त्यामुळे इंग्रजांचे राज्य असलेल्या ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, कॅरेबियन बेटे, भारत, श्रीलंका, अमेरिका, कॅनडा, झिम्बाब्वे, केनिया येथे क्रिकेटचा प्रसार झाला.
१९०९ मध्ये इम्पिरिअल क्रिकेट कॉन्फरन्सची स्थापना झाली. इंग्लंड, ऑस्ट्रलिया व दक्षिण आफ्रिका त्याचे सदस्य होते. १९१२ साली इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पण खराब हवामानामुळे ही स्पर्धा यशस्वी होऊ शकली नाही.
१९२६ मध्ये विंडीज, भारत आणि न्यूझीलंडला इम्पिरिअल क्रिकेट कॉन्फरन्सचे सभासदत्व देण्यात आले. १९५२ मध्ये पाकिस्तान तर १९८१मध्ये श्रीलंकेचा समावेश झाला. १९९२ मध्ये झिम्बाब्वे या समितीची सभासद झाली. ब्रिटिशांचे साम्राज्य अस्तास गेल्यावर इम्पिरिअलऐवजी इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल असे नाव झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतून १९७० पासून दक्षिण आफ्रिकेला वर्णद्वेशामुळे बहिष्कृत करण्यात आले होते. १९९२ मध्ये त्यांना पुन्हा प्रवेश देण्यात आला. कसोटी दर्जा मिळवणारा बांगलादेश हा सर्वात नवा संघ आहे. २००० साली बांगलादेशला कसोटी दर्जा देण्यात आला होता.
२०व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये क्रिकेटमध्ये अनेक बदल घडून आले. क्रिकेट खेळणाऱ्या देशांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. ६०च्या दशकात इंग्लंडमधील स्थानिक क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामने खेळवण्यात येऊ लागले. १९७१ या वर्षी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडयांच्यातील एक कसोटी सामना पावसामुळे वाया गेल्याची भरपाई म्हणून ५ जानेवारी १९७१ रोजी ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात मर्यादित सामना खेळवण्यात आला होता. हाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला एकदिवसीय सामना ठरला. त्यानंतर १९७५ साली पहिली क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली. सुरुवातीला ६० षटकांचे एकदिवसीय सामने खेळवले जात. नंतर ५० षटकांचे सामने खेळवण्यात येऊ लागले. १९७८ साली सुरू झालेल्या कॅरी पॅकर क्रिकेटनंतर रंगीत कपडे आणि पांढऱ्या चेंडूचा वापर एकदिवसीय क्रिकेटमध्ये होऊ लागला.
त्यानंतर क्रिकेटमध्ये क्रांतिकारी बदल घडून आला तो २१व्या शतकाच्या पहिल्या दशकात. या काळात इंग्लंडमध्ये २०-२० षटकांचे खेळवण्यात येऊ लागले. या सामन्यांना प्रचंड लोकप्रियता मिळू लागली. १७ जानेवारी २००५ रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात आला आणि क्रिकेटमधील नव्या पर्वाची सुरुवात झाली. २००७ पासून ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात येऊ लागली. ट्वेंटी-२० क्रिकेट कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटच्या तुलनेत प्रचंड लोकप्रिय झाले.
कालौघात क्रिकेटच्या कक्षा विस्तारत आहेत. आयसीसीचे सदस्य असलेल्या देशांची संख्या १००च्या पुढे गेली आहे. आयर्लंड, अफगाणिस्तानसारखे नव्या दमाचे संघ येत आहेत. ट्वेंटी-२० लीग यशस्वी होत आहेत. पण एकदिवसीय आणि ट्वेंटी-२० या मर्यादित षटकांच्या क्रिकेटच्या वाढलेल्या लोकप्रियतेमुळे कसोटी क्रिकेटसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. कसोटी क्रिकेटला वाचवण्यासाठी दिवसरात्र कसोटीचा विचार पुढे आलाय. पारंपरिक पांढरे कपडे आणि लाल चेंडू ऐवजी रंगीत कपडे आणि गुलाबी चेंडूचा वापर दिवसरात्र कसोटीत केला जातो. नोव्हेंबर २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला दिवसरात्र कसोटी सामना खेळवला गेला. बदलत्या काळाशी जुळवून घेत स्वतःमध्ये बदल घडवून आणणे क्रिकेटने अचूकपाने साधले आहे. त्यामुळे क्रिकेटची यशस्वी वाटचाल सुरू आहे आणि ती यापुढेही सुरू राहील.

भारतीय क्रिकेटची वाटचाल : आजघडीला क्रिकेट म्हणजे भारतात अघोषित धर्मच बनला आहे. आधुनिक काळात भारतात क्रिकेटचा प्रसार झाला तो ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेनंतर. इ.स. १७८४ मध्ये कोलकाता येथे भारतातील पहिला क्रिकेट सामना सामना खेळवला गेल्याची नोंद आहे. १७९२ मध्ये ईडन गार्डनवर नॅशनल क्रिकेट क्लबची स्थापना करण्यात आली.
१९ व्या शतकाच्या पूर्वार्धात सर्व संस्थाने खालसा होऊन ब्रिटिश साम्राज्य भारतीय उपखंडावर पसरल्याने क्रिकेटचा वेगाने प्रसार झाला. १८४८ मध्ये पारशी जिमखाना, १८६६ पीजे हिंदू, १८४३ मध्ये इस्लाम जिमखान्याची स्थापना मुंबईत झाली. पारशी जिमखान्याचा संघ प्रथम इंग्लंड दौऱ्यावर गेला. हिंदू, इस्लाम, पारशी, अशा संघांमध्ये १८९२ मध्ये दुरंगी, १९०७ मध्ये तिरंगी, १९१२ मध्ये चौरंगी, १९३७ मध्ये पंचरंगी सामने खेळवले जाऊ लागले.
१९२८ मध्ये क्रिकेट नियामक मंडळाची स्थापना झाली. त्याकाळी भारतावर राज्य असलेल्या ब्रिटिशांविरुद्धच पहिला कसोटी सामना खेळण्याची संधी भारताला मिळाली. १९३२ मध्ये लॉर्ड्स मैदानावर भारत व इंग्लंड यांच्यात पहिली कसोटी झाली. पण त्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. १९३४ मध्ये देशांतर्गत राष्ट्रीय स्पर्धेस सुरुवात झाली. इंग्लंडकडून खेळलेले पहिले भारतीय रणजी सिंग यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे रणजी करंडक स्पर्धा असे नामकरण करण्यात आले. सुरुवातीपासूनच या स्पर्धेवर मुंबईच्या संघाने दबदबा राखला असून मुंबईने तब्बल ४१ वेळा या स्पर्धेच्या विजेतेपदावर कब्जा केला आहे.
१९३२ साली पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय संघाला पहिला विजय मिळवण्यासाठी २० वर्षे प्रतीक्षा करावी लागली. १९५२ मध्ये पंचविसाव्या कसोटीत विजय हजारेंच्या नेतृत्वाखाली इंग्लंडवर मात करत भारताने पहिला कसोटी विजय मिळवला.
१९५९-६० मध्ये इराणी व १९६१-६२ मध्ये दुलीप करंडक खेळण्यास सुरुवात झाली. १९५२ साली पाकिस्तानवर मात करत भारताने पहिला कसोटी मालिका विजय मिळवला. १९६७ साली न्यूझीलंडमध्ये जिंकलेली कसोटी मालिका हा भारताचा परदेशातील पहिला कसोटी मलिका विजय ठरला. १९७१ मध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये मिळवलेले कसोटी मालिका विजय हे भारतीय क्रिकेटच्या वाटचालीतील मैलाचा दगड ठरले.
यादरम्यान १९७४ साली भारताने आपला पहिला एकदिवसीय सामना इंग्लंडविरुद्ध खेळला. पण कसोटी समान्याप्रमाणेच या सामन्यातही भारताला पराभूत व्हावे लागले. १९७५ आणि १९७९ साली झालेल्या पहिल्या दोन एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताची कामगिरी सुमार झाली होती. पण १९८३ साली वेस्ट इंडिजला नमवून भारतात क्रिकेटची लोकप्रियता कमालीची वाढली.